चंपा'च्या 'एन्ट्री'ने सत्तावर्तुळात नवी स्पर्धा:

चंपा'च्या 'एन्ट्री'ने सत्तावर्तुळात नवी स्पर्धा:



'चंपा'च्या 'एन्ट्री'ने सत्तावर्तुळात पुणे : 'खासदार गिरीश बापटच आमचे नेते, मनपाचे, शहराचे व माझे नेते हे खासदार गिरीश बापटच आहेत', असा पवित्रा घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उर्फ 'चंपा' यांनी शहर भाजपचा कारभार नियंत्रणात घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. पुणे मनपाच्या प्रश्नांबाबत त्यांनी नुकतीच मनपात बैठक घेतली. मात्र, शहराचे कारभारी गिरीश बापट यांची गैरहजेरी यावेळी चर्चेत आली. पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतानाच 'मी कोथरूडचा आमदार या नात्याने बैठका घेत आहे', असे सांगण्यात ते विसरले नाहीत. पुण्याचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, 'पीएमपीएमएल'चे संचालक अशा निवडीत प्रदेशाध्यक्ष या नात्याने पाटील यांनी लक्ष घातले होते. त्या पार्श्वभूमीवर शहरात नवे सत्ताकेंद्र उभे राहिल्याचे भाजपजनांचे म्हणणे आहे. बापट यांनी नुकतीच पुण्याच्या प्रश्नासंदर्भात दिल्लीत बैठक घेतली होती. त्यानंतर विमानतळाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सल्लागार समितीची बैठक घेतली. त्या पाठोपाठ पाटील यांनीही लगेचच कोथरूड येथील समस्यानिमित्त नियोजित बैठक घेतली. यावेळीपत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना पाटील यांनी आवर्जून आपले नेते बापटच असल्याचे सांगितले. तरीही पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडीत बापट समर्थकांना डावलण्यात आल्याने ही चर्चा रंगू लागली आहे. बापट खासदार झाल्यानंतर पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर शहराचा एकहाती कारभार 'दोन हाती' झाला. शहराध्यपदी आमदार माधुरी मिसाळ तर सरचिटणीसपदी गणेश बिडकर यांच्या नियुक्तीमागे हीच चर्चा सुरू झाली. महापौरपदासाठी बापट यांच्या गोटातून त्यांच्या एका विश्वासू नगरसेवकांचे नांव पुढे करण्यात आले होते. मोहोळ यांनी भावी काळात शहराध्यपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी त्यांची अपेक्षा होती. त्याचबरोबर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांचे अचानक आलेले नांव, सभागृह नेतेपदी धीरज घाटे, स्थायी समितीच्या अध्यक्षपदी रासने यांची नियुक्ती ही नव्या समीकरणाची नांदी मानली जाते. यावेळी पाटील यांचे पत्र दाखविण्यात आले. यापूर्वी या सर्व निवडी बापट यांच्या सूचनेनुसार होत असल्याचे चित्र होते. मात्र, पाटील यांच्या 'एन्ट्री ने सत्तावर्तुळात नवी स्पर्धा सुरू झाली आहे.